Rajbhasha Marathi essay in Marathi language मराठी बोली बोलणारे प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची ही भीती आपल्याला वाटत आहे. खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची! मराठी भाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अर्धशतक उलटून गेले आहे.
27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन! इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा प्राप्त होईल असे वाटत होते. भाषावार प्रांतरचनेच्या मागणीमागचे उद्दिष्टही हेच होते.
परंतु मराठी भाषा संवर्धित करण्याचे जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत किंवा जे काही प्रयत्न झाले ते पुरेशा सामर्थ्यांने आणि दूरदृष्टीने केले गेले नाहीत म्हणूनच ‘येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील काय?’ असा चिंतेचा सूर आज सतत ऐकू येत आहे. मराठी बाबतचा आपला दृष्टिकोन हा सामाजिक- सांस्कृतिक जीवनातील भाषाविषयक उथळ, अविवेकी, अतिभावनाशील अशा आपल्या एकंदर अनास्था दर्शक वृत्तीचा परिपाक आहे.
भाषा संवर्धन करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरीरीने बोलायची. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. हिंदी व बंगालीच्या उदाहरणावरून ते आपल्याला स्पष्ट दिसते. याबाबतीत मराठीची परिस्थिती आशादायक आहे. कारण आजच्या घडीला मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या सुमारे आठ ते साडेआठ कोटी आहे. पुढच्या 50 वर्षांतसुद्धा ही संख्या भक्कमच राहणार आहे.
त्यामुळे सर्वत्र आपण हिरीरीने मराठी बोलले पाहिजे. ती बोलायला लाजायचे कारण नाही. आपण आपल्या भूमीत भक्कम उभे आहोत, आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो, या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे. भाषेच्या विविध बोली जोपासणे आणि वाढवणेही तितकेच गरजेचे आहे. मराठीच्या अनेक बोली आहेत. त्यातील वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी असे काही ठळक भेद आपल्याला माहीत आहेत.
सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समूहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केला पाहिजे. याबरोबरच बोलीभाषांचे व्याकरण अद्ययावत करणे, त्यांच्यात साहित्यनिर्मिती करणे, त्या साहित्याचा गावोगावी प्रसार करणे, याही गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतील. कारण मराठीचे भवितव्य हे बोलींच्या विविधतेत आणि त्यांच्या समृद्धीतही सामावलेले आहे.
मुलांपेक्षा मुलींचे शाळागळतीचे प्रमाण बरेच अधिक आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यापासून बराच मोठा वर्ग वंचित आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाची चर्चा करायची तर पहिल्यांदा ही गळती थांबवली पाहिजे. समाजातील मोठ्या वर्गाला जर भाषेचे शिक्षणच मिळणार नसेल तर भाषेच्या संवर्धनाची वांझोटी चर्चा करण्यात काहीच हशील नाही. त्याआधी याकरता सर्व मुले-मुली निदान दहावीपर्यंत शिकतील आणि मराठी भाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळेल असे पाहिले पाहिजे.
शिक्षणासाठी इंग्रजीसारख्या परक्या भाषेचा स्वीकार केल्याने मराठी धोक्यात आली आहे, या मुद्दय़ाचाही विचार येथे करणे अपरिहार्य ठरावे. मराठी माध्यमातून शिकलेले लोक मराठी टिकवतील, ही कल्पनाही साफ चुकीची आहे. तसेच इंग्रजी माध्यमातून शिकलेले लोक मराठी बुडवतील, असेही समजण्याचे कारण नाही. ‘मराठी विरुद्ध इंग्रजी माध्यम’ असा वाद घालत न बसता मोकळ्या मनाने आणि संयमाने यासंबंधात विचार करायला हवा. आज खरी गरज आहे ती मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी इयत्ता पहिलीपासून चांगले, दर्जेदार इंग्लिश शिकवण्याची आणि प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकवण्याची!
Rajbhasha Marathi essay in Marathi language. राजभाषा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.