Naukari karnarya mahilancha samasya essay in Marathi language | नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या

Naukari karnarya mahilancha samasya essay in Marathi language – समाजात नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येते, त्याच बरोबर त्यांच्यात होणाऱ्या पिळवणूक व समस्या यांची सुद्धा वाढ झाली आपल्याला दिसून येते. बर्‍याचजणी मूल झाल्यावरही नोकरी/व्यवसाय करत राहण्याला प्राधान्य देत आहेत. हे चित्र कमी अधिक प्रमाणात जगभरातील आहे. ‘घर चालवणे’ ह्याबरोबरच बाहेर पडून घराबाहेर काम करणे ही जबाबदारी जरी बर्‍याच स्त्रिया घेत असल्या तरी हे सर्व करताना त्या नोकरी, मुलांचे संगोपन, घरकाम आणि नातेसंबंध/कार्यक्रम आणि ह्या सर्व पातळ्यांवर लढताना दिसून येतात.

घर आणि नोकरी किंवा व्यवसाय ही कसरत साधताना अनेक स्त्रियांवर अतिरिक्त ताण येतो. अजूनही भारतातल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाक, घरकाम आणि मुलांचे, घरातील ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन ही जबाबदारी मुख्यत्वे स्त्री पार पाडते. बर्‍याचदा घर आणि नोकरी-व्यवसायातील ताण आणि जबाबदार्‍या ह्याची परिणिती ही ह्या स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आजारपणात होते. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात पाहिल्यास स्त्रीवर जास्त बंधने आहेत. स्त्रियांना पार पाडाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या ताणाचे स्वरुप हे पुरुषांपेक्षा वेगळे आहे.

भावनिक समस्याही स्त्रियांमध्ये अधिक आहेत. त्या समजून घ्यायला हव्यात. स्त्रिया आणि पुरुष यांच्या मानसिक समस्यांची तुलना अनेक शास्त्रीय संशोधकांनी केली आहे. जागतिक आकडेवारी असे सांगते, की स्त्रियांमध्ये काही मानसिक आजारांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा अधिक आहे. ज्या आजारांचा संबंध प्रत्यक्षपणे स्त्रीत्वाशीच आहे. उदा. मासिक पाळी किंवा गरोदरपण, प्रसूती वगैरे. असे आजार फक्त स्त्रियांमध्ये आढळतात, हे उघडच आहे.

मात्र, नैराश्य, हिस्टेरियासारखे मानसिक आजार देखील स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. यांची कारणे वेगवेगळी आहेत. स्त्रीच्या शारीरिक रासायनिक संरचना ही पुरुषांपेक्षा मूलतः वेगळी असल्यामुळे स्त्रीच्या जीवनक्रमाचे जीवरासायनिक टप्पे हे पुरुषांपेक्षा वेगळे असतात. एकंदरीत सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात पाहिले, तर स्त्रीवर जास्त बंधने आहेत. स्त्रीकडून वेगळ्या अपेक्षा आहेत; म्हणून स्त्रियांना पार पाडाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या ताणाचे स्वरुप हे पुरुषांपेक्षा वेगळे आहे.

व्यसनाचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे, तर भावनिक समस्या आणि त्यांची वेगवेगळी रूपे स्त्रियांमध्ये अधिक आहेत. स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक नाजूक आणि कमकुवत असते, हा एक सर्वश्रुत समज आहे. मात्र, वस्तुतः त्यात तथ्य नाही. स्त्रीच्या स्नायूंमधील ताकद पुरुषांपेक्षा कमी असली; तरीही जैविकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या स्त्री ही पुरुषांपेक्षा जास्त चिवट असते. अनेकदा तणावग्रस्त परिस्थितीत पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त चिकाटीने तग धरतात. त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीचे मासिकचक्र, गरोदरपण, प्रसूती, पालकत्व, त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची नैसर्गिक ताकद तिच्यात आहे. स्त्रीच्या शारीरिक आरोग्यासह मनाची घडणही गुंतागुंतीची आहे.

या सगळ्या रेट्यात तिच्यातील मानसिक समस्या वाढत्या आहेत. आधुनिकतेची आव्हाने पेलता पेलता संस्कृतीरक्षकांची मर्जी राखण्यात तिची शारीरिक- मानसिक दमछाक होते. या तिच्या मानसिक समस्या ओळखण्याची संवेदनशीलता तिच्या कुटुंबाकडे असेलच, असे सांगता येत नाही. त्या ओळखल्यानंतर त्यावर उपचार करण्याची तयारी असेलच, असेही नाही. त्यामुळे अनेक स्त्रिया आजही मानसिक अनारोग्याच्या चक्रात वर्षानुवर्षे अडकून राहतात. त्यावर योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. अनेक स्त्रिया शारिरिक – मानसिक – लैंगिक शोषणाच्या, हिंसेच्या बळी आहेत. त्याचाही परिणाम स्त्री शरीरस्वास्थ्यावर होतो. एका बाजूला आधुनिक शहरी सुशिक्षित स्त्रिया, तर दुसऱ्या बाजूला घर, नोकरी, व्यवसाय या कात्रीत सापडल्यामुळे होणारी कुतरओढ स्त्रिया सहन करतात. त्यांच्या समस्यांच्या छटा वेगळ्या स्वरुपाच्या आहेत.

ज्या स्त्रियांना आपल्या मानसिक समस्या शब्दांत व्यक्त करण्याची मुभा नाही, त्यांचे मानसिक संघर्ष दडपले जातात. त्यांच्या मानसिक समस्या अनेकदा शारीरिक लक्षणांमधून दिसून येतात. कुठलाही शारीरिक आजार नाही; तरीही शारीरिक लक्षणे आहेत, अशा स्त्रिया केवळ या लक्षणांवर वर्षानुवर्षे उपचार घेताना दिसतात. त्यातही त्या बऱ्या होत नाहीत. औषधोपचार घेणेही थांबवत नाहीत. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे खालावणाऱ्या स्त्रियांच्या मानसिक समस्यांचा वेध आपण घेणार आहोत. आपण समाजात राहतो म्हणून आपण ही स्त्रियांच्या समस्या समजावून घ्यायला पाहिजे. त्यांना थोडा मोकळा श्वास घेऊ द्यावा असे मला वाटते.

Naukari karnarya mahilancha samasya essay in Marathi language नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या या विषयावर निबंध तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment