सर्कशीतील हत्तीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Circus Elephant Essay in Marathi

Autobiography of Circus Elephant Essay in Marathi: ऐका, मित्रांनो, मी सर्कशीतला एक वृद्ध हत्ती बोलतोय. या वार्धक्यात माझ्यापुढे हा केवढा बिकट प्रश्न उभा राहिला आहे ! मी आता कुठे जाऊ? ना घर का ना घाट का, अशी माझी अवस्था झाली आहे ! असं का झालं तुम्हांला ठाऊक आहे ? नाही ना? थांबा तर तुम्हांला मी माझी सर्व कहाणीच आता सांगतो.

सर्कशीतील हत्तीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Circus Elephant Essay in Marathi

सर्कशीतील हत्तीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Circus Elephant Essay in Marathi

शरावती खोऱ्यातील अभयारण्यात माझा जन्म झाला. अतिशय निसर्गसंपन्न असे ते अरण्य होते. हिरव्यागार रानात खेळताना किती मजा येत होती! लहानपणी काही काळ आई-वडिलांबरोबर राहिल्यावर मी समवयस्क मित्रांबरोबर रमू लागलो. त्या वेळी पाण्यात डुंबणे हा माझा सर्वांत आवडता खेळ होता. अरण्यात खाण्यापिण्याची चंगळ होती. मस्त पाण्यात डुंबायचे, रानातली आवडणारी झाडांची पाने व वेली मनसोक्त खायची आणि मग निळ्याशार आकाशाखाली गाढ झोपायचे. रात्रीच्या वेळी झोप आली नाही तर आकाशातील चंद्र व चांदण्या यांचा लपंडाव पाहत राहायचे. असे होते ते मस्त जीवन ! पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस ते सुख आले; कारण एके दिवशी मी माणसाच्या तावडीत सापडलो. त्यालाही कारण माझा डुंबण्याचा छंदच होता.

आजही मला तो दिवस आठवतो. आम्ही सर्व दोस्तमंडळी पाण्यात डुंबत होतो. काही वेळानंतर माझ्याबरोबरचे मित्र पाण्याबाहेर गेले; पण माझी हौस फिटली नव्हती. मी एकटाच पोहत पोहत दूर गेलो. माझ्या लक्षातही आले नाही की मी अभयारण्यापासून खूप दूर आलो आहे. पोहताना एका ठिकाणी माझे पाय अडकले, मला वाटले शेवाळ असेल. पण छे ! पाय सुटेनात. कारण ते शेवाळ नव्हते, तर जाळे होते. थोड्याच वेळात काही लोक आले. त्यांनी भल्यामोठ्या दोरखंडात मला जखडले आणि माझी वरात शहराकडे निघाली.

त्या क्षणापासून माझे गुलामगिरीचे जीवन सुरू झाले. माझ्या करणीने माझे स्वातंत्र्य हरपले होते. एका सर्कशीत माझी वर्णी लागली. भलीमोठी सर्कस होती ती! अनेक प्राणी आणि कसरतपटू होते त्या सर्कशीत. सकाळपासून सराव चाले. सर्वांत लहान म्हणून माझे खूप कौतुक होत असे. मला सांभाळणारा माहूतही ‘बच्चा बच्चा’ म्हणून माझे खूप प्रेमाने लाड करी. त्यावेळी मला काही काम नसे आणि अजून माझ्या पायात साखळदंडही पडला नव्हता. म्हणून मी त्या जगण्यातही रमून गेलो.

जसजसा मी मोठा होऊ लागलो तसतसा माझा अभ्यासक्रम सुरू झाला. माझ्यातील हूडपणा कमी होत नव्हता. मग अनेकदा चाबकाचे फटके बसू लागले; अंकुशाची टोचणी सहन करावी लागली. शेवटी मला कळून चुकले की, आता आपण इथले गुलाम आहोत. हूडपणा करून काही उपयोग नाही. मग मी खेळाचे सर्व प्रकार झटपट शिकून घेतले. रिंगमास्तरचा प्रत्येक शब्द मी ऐकू लागलो. त्याच्या हुकमानुसार वागू लागलो.

आजही मला सर्कशीच्या तंबूतला माझा पहिला दिवस आठवतो. त्या दिवशी मला खास सजवण्यात आले होते. अंगावर मखमली झूल व चमकणारे चांदीचे दागिने घालण्यात आले होते. माझा मास्तर मला ‘इंद्रा’ म्हणून हाक मारत असे. मोठ्या प्रेमाने त्याने स्वतः मला रिंगणात नेले आणि त्याच्या आज्ञेनुसार मी एकापाठोपाठ एक खेळ केले. मास्तर एवढा खूश झाला की परत आल्यावर त्याने मला पुडाभर पेढे चारले.

“अशी कित्येक वर्षे मी सर्कशीत काढली. माझ्या सर्व खेळांतील ‘गणेशपूजे’ चा खेळ सर्वांना विशेष आवडे. प्रेक्षक खूप टाळ्या वाजवत; मग मीपण देहभान विसरून काम करी. आता अरण्यातील स्वातंत्र्याचा विसर पडला होता. मी म्हातारा झालो होतो. त्यांतच भर म्हणजे मूक प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या संस्थेने सर्कशीतील प्राण्यांच्या खेळांवर भूतदयेपोटी आक्षेप घेतला. म्हणून मला मुक्त करण्यात आले. मात्र, आता इतक्या वर्षांनी मी अरण्यातही जाऊ शकत नाही. म्हणून या शिवालयाबाहेर कसेतरी दिवस काढत आहे. पूर्वीचा रुबाब नाही के पूर्वीची चैन नाही!”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment