बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध Unemployment in India Essay in Marathi

Unemployment in India Essay in Marathi: आज मी आयुष्याची विशी ओलांडली आहे; पण आजपर्यंत मला एक दिवसही सुखाचा लाभला नाही. लहानपणापासून गरिबी पाचवीला पुजलेली होती. माझे बाबा एका गिरणीत कामगार होते. गिरणगावातच एका जुन्या चाळीत आम्ही राहत होतो. आई-वडील, मी आणि माझी दोन भावंडे. सगळी हलाखीचीच परिस्थिती होती.

 

बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध Unemployment in India Essay in Marathi

दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना, तसेच झाले. गिरण्यांचा संप सुरू झाला. पगार बंद झाला. एका वेळेच्याही जेवणाचा प्रश्न पडू लागला. आईने कंबर कसली. पूर्वी दोन-तीन घरची कामे ती करत होती, आता सात-आठ घरची कामे तिने धरली. माझी लहान भावंडे तिच्या मदतीला जात असत. बाबांनीही दोन-तीन दुकानांत साफसफाई करण्याचे काम धरले. सगळेजण कष्ट करत होते, मला लाज वाटे. आपणही काहीतरी काम करावे असे वाटे. पण बाबा म्हणत, ‘तू तुझी परीक्षा पूर्ण कर, मग तुला नोकरी लागेल.’

लवकरच चांगल्या गुणांनी एस्. एस्. सी. पास झालो. वाटले आता नोकरी लागेल. आई-बाबांना सुख देऊ. धाकट्या भावंडांचे शिक्षण पुढे सुरू करू. पण छे ! साऱ्या अपेक्षांचा भंग झाला. अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज टाकले; पण वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार यांमुळे हतबल झालो. साधी शिपायाची नोकरीही मिळत नव्हती. अनेकजण अवहेलनेने माझ्याकडे पाहतात. ‘छोटा-मोठा धंदा सुरू कर,’ असा सल्ला देतात काहीजण; पण धंदा सुरू करायला भांडवल कोण देणार?

“प्रामाणिकपणे काम करायची इच्छा असूनही मला काम मिळत नाही. बेकायदेशीर कामांचे मार्ग अधूनमधून खुणावतात. माझे काही बेकार मित्र वाईटसाईट कामे करून, काळाबाजार करून पैसे मिळवतात. गुंडगिरी करणाऱ्या येथील लोकांत ते सामील झाले आहेत. पण अनैतिक मार्गाने पैसा मिळवणे, मला जमणार नाही; रुचणार नाही. पोटासाठी मी माझी नीती सोडणार नाही.

“बेकारीचे हे दिवस नकोसे झाले आहेत. भ्रष्ट समाजाचा वीट येतो. कधी कधी आत्महत्येचे विचारही मनात येतात. पण त्याच क्षणी राबणाऱ्या आईची आठवण येते आणि हा पळपुटेपणा नको, असे वाटते. कधी संपेल ही बेकारी?…

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!