साने गुरुजी एक आदर्श मराठी निबंध Sane Guruji Essay in Marathi

Sane Guruji Essay in Marathi: मी पाचवीत असताना साने गुरुजींची ‘सुंदर पत्रे’ वाचली. एका पत्रात सुधाला धर्माची कल्पना समजावून देताना गुरुजी लिहितात, “आपण पोस्टकार्ड लिहितो. त्यावर स्वच्छ, सुंदर अक्षरांत पूर्ण पत्ता लिहिला तर आपण पोस्टमनबाबतचा धर्म पाळला, असे होईल.” धर्माची इतकी सोपी, सुंदर कल्पना माझ्या मनावर कायमची ठसली. गुरुजींच्या जीवनातून मिळालेला हा एक अनमोल आदर्श आहे. कोणतेही काम करताना प्रथम दुसऱ्याचा विचार करा, हे त्यांचे म्हणणे होते. साने गुरुजींनी अगदी छोट्या छोट्या वाक्यांतून महान सत्य मुलांना सांगितले-‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।’ गुरुजी किती सोप्या शब्दांत धर्माची कल्पना मांडतात ! गुरुजी हे हाडाचे शिक्षक होते.

 

साने गुरुजी एक आदर्श मराठी निबंध Sane Guruji Essay in Marathi

साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. १८९९ साली त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. त्यांचे बालपण कोकणात गेले. त्यांच्या साहित्यात कोकणातील हिरवेपणा व आंब्यातील मधरता भरून राहिली आहे. गुरुजींनी मुलांसाठी भरपूर लेखन केले; कारण-

‘करील जो मनोरंजन मुलांचे,
जडेल नाते प्रभूशी तयांचे.’

अशी त्यांची भावना होती. ‘गोड गोष्टी’ (दहा खंड), ‘धडपडणारी मुले’, ‘बापूजींच्या गोड गोष्टी’ (सहा खंड), ‘तीन मुले’ असे उत्कृष्ट बालसाहित्य गुरुजींनी निर्माण केले. मुलांना कथा सांगून रंगवून टाकायचे ही तर गुरुजींची खासियत होती. त्यांचाच आदर्श ठेवून अनेक मंडळांनी ठिकठिकाणी ‘साने गुरुजी कथामाला’ सुरू केल्या.

गुरुजींच्या बालमनावर त्यांच्या आईने सुसंस्कार केले होते. आईला ते सर्वस्व मानत. त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात ते सांगतात, “माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणाने बघायला, प्रेमळपणे बोलायला तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे; तर गाई-गुरांवर, फुलपाखरांवर व झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच शिकवले.” साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा उल्लेख आचार्य अत्रे, ‘मातृप्रेमाचा महान मंगल स्रोत’ असा करतात, तर “श्यामची आई हे एक वाचनीय पुस्तक नसून ते एक अनुभवण्याचे पुस्तक आहे,” असे कविवर्य वसंत बापट सांगतात. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारलेल्या आचार्य अत्रे निर्मित चित्रपटाला ‘राष्ट्रीय सुवर्णकमळ’ हे पारितोषिक मिळण्याचा पहिला मान मिळाला होता.

गुरुजींना भारतीय संस्कृतीविषयी विशेष आदर होता. या संस्कृतीची वैशिष्ट्ये त्यांनी ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकात सर्वांसाठी सहज टिपली आहेत. भारतातील अनेक भाषांविषयी गुरुजींना विशेष आकर्षण होते. विविध भाषांचा अभ्यास व्हावा आणि त्यानिमित्ताने सर्व भारतीय अंत:करणाने एकमेकांच्या जवळ यावेत म्हणून त्यांनी ‘आंतरभारती चळवळ’ सुरू केली.

गुरुजी हे स्वातंत्र्यलढ्यातील एक सैनिक होते. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत ते भूमिगत होऊन कार्य करत होते. नंतर त्यांनी तुरुंगवासही सोसला. साने गुरुजींची समाजविषयक जाणीवही सखोल होती. त्यांना जातिभेद, धर्मभेद बिलकूल मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी पंढरपूरच्या देवळात सर्व जातिपातींच्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले आणि प्रवेश मिळवून दिला.

आपल्या भोवतालचे हिंसक, अविचारी जीवन साने गुरुजींच्या प्रेमळ मनाला सहन झाले नाही, तेव्हा १९५० मध्ये त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. गुरुजी देहाने गेले; पण त्यांची पुस्तके, त्यांचे लेखन आजही आपल्यापुढे उच्च, उदात्त आदर्श ठेवते.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!