माझे आदर्श गाव मराठी निबंध My Ideal Village Essay in Marathi

My Ideal Village Essay in Marathi: लोकहो, मी एक आदर्श गाव आहे. ‘निर्मल ग्राम अभियान’ स्पर्धेत मला पहिला क्रमांक मिळाला आहे. २००५ सालचा आदर्श गावाचा दोन लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मी पटकावला आहे. हे यश मिळणे सोपे काम नव्हते. त्यासाठी अनेकजण अनेक वर्षे राबले आहेत. थांबा मी तुम्हांला माझी सर्व कहाणीच सांगतो.

माझे आदर्श गाव मराठी निबंध My Ideal Village Essay in Marathi

माझे आदर्श गाव मराठी निबंध My Ideal Village Essay in Marathi

महाराष्ट्रातील अनेक छोट्या गावांसारखाच मी एक गाव – खेडेगाव. गाव कसले काही कुटुंबांची एक छोटीशी वस्ती. जेमतेम ६०-६५ कुटुंबे येथे एकमेकांच्या आधाराने राहतात. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘६५ उंबरा’ असलेली वस्ती. कुंडलवाडी हे माझे नाव. पण आता मला सगळे ओळखतात ते ‘लहूंबाईचं गाव’ म्हणूनच. येथे साधारण तीनशे-साडेतीनशे लोकांची वस्ती असेल.

दोन हजार सालापूर्वी माझा मुखडा इतर गावांसारखाच होता. आजार, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा यांचे येथे साम्राज्य होते. भांडणे, वादावादी यांना महापूर आला होता. सगळीकडे अस्वच्छता होती. कुठेही संडासाची सोय नव्हती. त्यामुळे नाकावर फडके धरल्याशिवाय येथे येणे कोणालाही शक्य नव्हते. काड्याकाटक्यांच्या जळणावर चुली पेटत, त्यामुळे दुपारी व रात्री सगळीकडे धुराचे साम्राज्य असे.

या माझ्या रूपात अचानक बदल कसा झाला? हा बदल एकदम झाला नाही, हळूहळूच झाला. त्याचे श्रेय जाते ते लक्ष्मीबाईकडे म्हणजे गावाच्या लहूंबाईकडे. लक्ष्मीबाईयेथील येथील माहेरवाशीण आणि येथील सासुरवाशीणही. त्यामुळे येथील परिस्थिती, लोकांच्या सवयी तिला अचूक माहीत होत्या. त्यात तिला तिच्या दोन्ही घरांकडून पाठबळ मिळाले.

लहूंबाईंनी सगळ्या बायकांना एकत्र केले. घरटी एक माणूस असा ६० माणसांचा गट तयार केला व श्रमदानाला सुरुवात केली. प्रत्येकाने आपले घर, अंगण, स्वच्छ नीटनेटके ठेवायचे. गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे बक्षीस मिळवायचेच अशी सर्वांनी जिद्द ठेवली. प्रथम मला तालुका स्तरावरील पंचवीस हजाराचे बक्षीस मिळाले. त्यामुळे सर्वांचा उत्साह वाढला. लहूंबाईंनी ही रक्कम ‘यशवंत ग्रामसमृद्धी योजनेत ‘ टाकली. मग शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून १.५ लाख रुपये मंजूर करून घेतले. हे पैसे व गावकऱ्यांचे श्रमदान यातून नदीला, ओढ्याला बंधारे घातले. त्यातून मला १५ लाख रुपये मिळाले. ‘शेतीसाठी पाणी’ ही योजना मंजूर झाली. त्यामुळे सगळ्यांची जमीन ओलिताखाली आली.

मग लहूंबाईने जिद्दीने मला हगणदारीमुक्त केले. ‘घर तिथं शौचालय बांधण्यात आले. सांडपाण्यासाठी गटारे बांधली. त्या सांडपाण्यावर माझ्या ठिकाणी चार परसबागा लावण्यात आल्या. या बागांमध्ये केळी, चिकू इत्यादी फळे, विविध फुलझाडे फुलू लागली. घर तिथे गोबरगॅस योजना राबवली. वाया जाणाऱ्या शेण-कचऱ्याचा उपयोग होऊ लागला. जंगलतोड थांबली. माझा परिसर निर्मळ झाला. रोगराई पळून गेली. राष्ट्रपतींनी गौरव केला. अनेक मोठ्या लोकांनी मला भेटी दिल्या.

“आता येथे शाळा आहे, सभागृह आहे. प्रार्थनामंदिर आहे. सावकारीला, दारूला बंदी आहे. सगळेजण एकजुटीने राहतात आणि लहूंबाईला गौरवतात आणि विकासाच्या पथावर पावले टाकतात.”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!