माझा आवडता समाजसेवक डॉ. अभय बंग मराठी निबंध My Favourite Social Worker Essay in Marathi

My Favourite Social Worker Essay in Marathi: तुमचा आदर्श कोण? असा प्रश्न विचारला की बहुतेक युवक गोंधळून जातात. आज आमच्यापुढे कोणीही आदर्श नाही, असे काहीजण नकारार्थी उत्तर देतात; तर काहीजण भूतकाळात चाचपडू लागतात. पण आजही आपल्या भोवताली काही ध्येय ठेवून जगावेगळे जीवन जगणारी माणसे आहेत. याची त्यांना जाणीवच नसते. अशा जगावेगळ्या व्यक्तींपैकी एक आहेत डॉ. अभय बंग.

माझा आवडता समाजसेवक डॉ. अभय बंग मराठी निबंध My Favourite Social Worker Essay in Marathi

माझा आवडता समाजसेवक डॉ. अभय बंग मराठी निबंध My Favourite Social Worker Essay in Marathi

डॉ. अभय बंग यांना हा सामाजिक कामाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांचे बालपण वर्ध्यात गांधीवादी कुटुंबात गेले. वैदयकीय क्षेत्रातील अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विदयापीठाची ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावरची पदवी त्यांनी सुवर्णपदकासहमिळवली. १९८४ मध्ये ही पदवी मिळवल्यावर त्यांना जगात कोठेही मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण डॉ. बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांनी विदर्भातील गडचिरोलीला आदिवासींमध्ये आपले काम सुरू केले.

त्यांचे हे कार्यक्षेत्र सर्वच बाबतीत मागासलेले होते. म्हणून त्यांनी ‘शोधग्राम’ ऊर्फ ‘सर्च’ची स्थापना केली. त्यांनी या विभागात ‘माँ दंतेश्वरी रुग्णालयाची’ स्थापना केली. ‘माँ दंतेश्वरी’ ही या आदिवासी समाजाची देवता. या आदिवासींना हे रुग्णालय आपले वाटावे म्हणून त्यांनी आदिवासींच्या घराप्रमाणेच झोपड्यांमध्ये हे रुग्णालय सुरू केले. साध्या झोपड्यांमध्ये उभे केलेले हे सर्वांत आधुनिक रुग्णालय आहे.

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी या परिसराचा अभ्यास केला. तेव्हा स्त्रियांतील अनारोग्य आणि बालमृत्यू या दोन समस्या त्यांना तीव्रतेने जाणवल्या. त्यामागची मुख्य कारणे होती अज्ञान आणि अपुरा आहार. अभय बंग यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील बालमृत्यूंबाबतही संशोधन केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, केवळ गडचिरोलीत नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण मोठे आहे. डॉ. अभय बंग यांनी केलेला हा अभ्यास ‘कोवळी पानगळ’ या नावाने प्रसिद्ध आहे.

बालमृत्यूंच्या या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ‘सर्च’ने स्वतः पुढाकार घेतला. त्यासाठी डॉक्टरांनी स्थानिक लोकांचीच मदत घेतली. तेथील स्त्रियांतूनच सुईणी म्हणजे दाई आणि आरोग्यदूत निर्माण केले. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. या आरोग्यदूत उपक्रमामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात ‘सर्च’ला यश मिळाले. आदिवासींच्या आरोग्यसुधार कार्यक्रमाबरोबर त्यांचे जीवनमान सुधारणे हेही डॉ. बंग पतिपत्नीचे ध्येय राहिले आहे. त्यासाठी शेतीसुधारणा, ग्रामकोष, बचतीचे मार्गही त्यांना दाखवले. डॉक्टरांच्या या सर्व कामाचा संपूर्ण जगात लौकिक पसरला आहे व त्यांना नाना पुरस्कार मिळाले आहेत.

माणूस जेव्हा दुसऱ्यांसाठी जगतो, तेव्हा तो नेहमी दुसऱ्याचा विचार करतो, डॉ. बंग यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यावर त्यांनी ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे पुस्तक लिहिले. स्वत:ला झालेला हृदयविकाराचा त्रास व त्यावर स्वतः शोधलेला उपाय यांचा इतरांना उपयोग व्हावा, म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले. ते आज अनेकांना मार्गदर्शक ठरले आहे. डॉ. अभय बंग यांनी सतत इतरांचाच विचार केला. जो स्वत:साठी जगला, तो मेला. जो इतरांसाठी जगला, तो जगला, डॉ. अभय असेच आहेत. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आजच्या युवकांना मार्गदर्शक ठरले आहे.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!