“शेतकरी जगाचा पोशिंदा” मराठी निबंध – Best Essay On Indian Farmer In Marathi

Essay On Indian Farmer In Marathi: खरंतर ह्या कोरोनाच्या काळात सारा देश लॉकडाऊन असताना ह्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या हेतूनं दोन दोन किलोमीटर लाईन लावून पूर्ण पोलीस संरक्षणात दारूची विक्री केली जाते, त्याचं 65% शेतकरी असलेल्या देशात मात्र ह्याच कोरोनाच्या काळात पिकाला हमीभाव भेटला नाही म्हणून स्वतःच्या कष्टाने पिकवलेला, लेकरागत वाढवलेला शेतीमाल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर येते.

Essay on Indian Farmer in Marathi

“शेतकरी जगाचा पोशिंदा” मराठी निबंध – Best Essay On Indian Farmer In Marathi

उभ्या जगाचा पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहतो तेव्हा मात्र नटींच्या मेकअप पासून ते माणसांच्या ब्रेकअपची खबर ठेवणाऱ्या पैसे खाऊ मीडियाला तेही दिसत नाही, म्हणून मी नागेश भास्करराव सोंडकर दिवसातले चौवीस तास, वर्षातले ३६५ दिवस त्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा लेक म्हणून शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा ह्या विषयाला हात घालताना एक सांगू इच्छितो,

“एक फटका कुंचल्याचा बसलाच पाहिजे,
वळ माझ्या शेतकऱ्याचा दिसलाच पाहिजे!”

नक्की वाचा – माझा वाढदिवस मराठी निबंध

खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट होऊन उभी आहे, त्याच माझ्या शेतकऱ्याच्या घरात मात्र सदानकदा अंधार दाटून येतो, आलेली दिवाळी त्याच दिवाळ काढल्याशिवाय राहत नाही, कर्ज दिलेला सावकार शेतकऱ्याला विकत घेतल्याचा आव आणतो, नेत्यांची भाषणं शेतकऱ्यांना दिलेल्या पोकळ आश्वासनांनी गाजून जातात आणि लेकीचं लग्न करायला हातात पैसा उरला नाही म्हणून सातबाऱ्याच्या कागदावर मालक असलेला शेतकरी मात्र गळ्याला फास लावून आत्महत्या करतो…अरे लॉकडाऊन मध्ये विकलेल्या दारूच्या बळावर नाही, घरात खायला तुकडे नसतानाही तो उभ्या जगाचं पोट भरतो त्याच माझ्या शेतकऱ्याच्या गेलेल्या बळीवर आमच्या देशाची अर्थव्यवस्था आजही ताठ उभी आहे….!!

शेतकऱ्याचा लेक म्हणून ह्या विचारांच्या मंचावर शेतकऱ्याला मांडताना, शाळेत असताना बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या कवितेच्या ओळी ओंठावर येतात,

शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप,
तिथं राबतो कष्टतो, माझा शेतकरी बाप,
लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर,
काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर,
काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप,
माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा,
त्याच्या भाळी लिहिलेला, रातदिस कामधंदा….

वर्षानुवर्षे लोटली तरी कवितेतल्या शेतकरी बापाची आणि वास्तवातल्या शेतकरी बापाची व्यथा सारखीचं राहिली, मग मनाला इंगळीगत प्रश्न टोचला जातो, कवितेतल्या शेतकरी बापाची आणि वास्तवातल्या शेतकरी बापाची व्यथा कधी बदलणार? विंवेचनेच्या कहाणीचा सार कधी बदलणार? ज्याच्या जीवावर देश पोट भरतो, तो किमान सुखानं, समाधानानं कधी राहणार? पंचवार्षिक योजनेपासून ते आर्थिक बजेटपर्यंत शेतकऱ्याला घोषित केला जाणारा पैसा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसा पोहचणार?

मध्यंतरी महाराष्ट्र सरकार मधल्या एका जबाबदार मंत्र्याने तुरीला भाव दिला तरी रडतात साले हे विधान केलं होतं, स्वतःचं पोट मारून काळ्या आईच्या गर्भात स्वतःच्या स्वप्नांची पेरणी करणारा आमचा बळीराजा त्यांना साला वाटतो, तेव्हा मात्र लेखणीचे टोक मोडून चाबकाचे फटकारे मारावे वाटतात, जेव्हा पाचवी पंचवार्षिक योजना मांडली गेली, ह्या देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या शेतीला पाचव्या पंचवार्षिक योजनेचा बारा टक्के इतका तुटपुंज भाग देण्यात आला. आजही देशात शेतमाल रस्त्यावर आणि चप्पल बुटासारखे पायातले पायातनं सुद्धा ऐसीच्या रूममध्ये विकले जातात, ज्या दिवशी शेतमाल सुद्धा मॉल मध्ये विकला जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं ह्या देशातील पोशिंदा हायटेक झाला असं म्हणता येईल…

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या काळातही दुष्काळ पडला होता, पण त्यांच्या स्वराज्यात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही, याच महत्वाचं कारण महाराजांची शेतीविषयक धोरणं होती, त्यांनी कोणत्याही शेतकऱ्याची हेळसांड होऊ दिली नाही. शिवछत्रपतींच्या विचारांचा आदर्श सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनी छत्रपतींच्या धोरणांचा खऱ्या अर्थानं अवलंब करायची गरज निर्माण झाली आहे.

ज्यानं उभ्या जगाचं पोट भरलं त्याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे, शेतकऱ्याने आणि शेतकऱ्याच्या पोरांनी हायटेक प्रणालीचा उपयोग करून शेती करायला हवी. सरकारने घोषणांचा पाऊस पाडण्याऐवजी पिकाला हमीभाव मिळवुन द्यायला हवा, देशात wifi zone नाहीतर ऍग्रीकल्चर झोन तयार व्हायला हवेत, playstore च्या अँप मध्ये शेतीविषयक अँप च्या अग्रभागी समावेश व्हायला हवा, ग्राहक ते शेतकरी असा डायरेक्ट संबंध तयार व्हायला हवा, असं झालं तर सुखानं समाधानानं जगताना एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, जाता जाता एक सांगतो

सूर म्हणतो साथ दे,
दिवा म्हणतो वात दे,
दारिद्र्याच्या, दुष्काळाच्या, अन्यायाच्या,
गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला
बापा तुझ्या मदतीचा हात दे,
एवढाच आशावाद
धन्यवाद!!

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!