Autobiography of Successful Film Essay in Marathi: मित्रांनो, मी आहे तुमचा आवडता मराठी चित्रपट ‘श्वास’. अनपेक्षितपणे मला यश मिळाले. तुम्ही सर्वांनी मला डोक्यावर घेतलेत. एवढेच नाही तर ‘ऑस्कर स्पर्धेसाठीही’ आपल्या देशातून माझी निवड आणि पाठवणी झाली. असं काय होतं माझ्यामध्ये ? खरं पाहता, इतर चित्रपटांशी तुलना केली तर नेहमी चित्रपटात असणाऱ्या अनेक गोष्टी माझ्यात नव्हत्या.
एका यशस्वी चित्रपटाचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Successful Film Essay in Marathi
माझ्यात काम करणारे कोणीही विख्यात रूपसुंदर नट-नट्या नव्हत्या ! माझ्यामध्ये नृत्य-गायनाचे जलसे नव्हते. माझ्यात एकही मारामारी नव्हती. सूडचक्र नव्हते आणि कोणी खलनायकही नव्हता. तरी तुम्ही मला डोक्यावर घेतलेत !
माझी कथा ही एका व्याधिग्रस्त बालकाची व त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आजोबांची कथा होती. त्यामुळे सर्वांना ती मंत्रमुग्ध करणारी ठरली. कोकणातल्या एका खेडेगावातील ते अकृत्रिम नाते ! आपल्या नातवाची दृष्टी धोक्यात आहे, हे जाणताच आजोबा जिवाचे रान करतात. शहरातही त्यांना डॉक्टर, समाजसेविका यांच्याकडून चांगले मार्गदर्शन व मदत मिळते. पण खूप धडपडीनंतरही आपल्या नातवाच्या जीवनात येऊ घातलेला कायमचा अंधार आजोबांना हादरवून टाकतो. त्यामुळे रुग्णालयाचे नियम मोडूनही आजोबा नातवाला मुंबई दाखवायला घेऊन गेले. सर्जन व इतर मंडळींची घाबरगुंडी उडाली. नको, नको त्या शंका आल्या. खूश झालेल्या नातवासह आजोबा परतले, तेव्हा प्रथम डॉक्टर संतापले. पण त्यांनी आजोबांचे मन ओळखून त्या छोट्याची खोली सजवली व नंतर त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली. इतकी साधी कथा पण अतिशय हृदय. त्यामुळे सर्वांच्या मनाला जाऊन भिडली. मग मला पाहायला वेगवेगळ्या भाषांतील लोकांनीही गर्दी केली. भाषेचा अडसर राहिला नाही.
ऑस्कर स्पर्धेसाठी माझी निवड झाली तेव्हा इंग्रजी भाषेतील पट्टिका मला जोडण्यात आल्या. ऑस्करसाठी परदेशात जायचे म्हणजे पैशांचा प्रश्न आला. पण लोकांच्या प्रेमामुळे हा प्रश्न सुटला. माझ्यावर हितचिंतकांनी धनाचा वर्षाव केला. त्यामुळे आमची परदेशवारी अगदी सहज पार पडली. सातासमुद्रापलीकडेही खूप गौरव माझ्या वाट्याला आला. एवढंच नाही, तर माझ्या बालकलाकाराला- अश्विन चितळेला उत्कृष्ट कलागुणांसाठी सुवर्णपदक मिळाले ! मला अगदी धन्य धन्य वाटले !
“त्यापेक्षाही आणखी एक कृतार्थतेचा क्षण मला लाभला. माझ्या बालकलाकाराला जी व्याधी दाखवली होती. तशीच व्याधी कोकणातील एका खेडेगावातील मुलीला झालेली आढळली. ते माझ्या निर्मात्यांकडे आले. त्यांनी त्या मुलीला मुंबईच्या रुग्णालयात आणले आणि तिच्या डोळ्यांवर उपाय केले. तेव्हा तिची दृष्टी अंशतः तरी वाचवता आली. तेव्हा मला खूप खूप आनंद झाला.”