यशस्वी कलावंताचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of Successful Artist Essay in Marathi

Autobiography of Successful Artist Essay in Marathi: रसिक प्रेक्षकहो, मायबापहो होय ! तुम्ही आम्हा कलावंतांचे मायबाप आहात. तुम्ही मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलेत म्हणून तर मी आज या अत्युच्च शिखरावर येऊन पोहोचलो आहे. मात्र या स्थानाला मी ‘शिखर’ म्हणणार नाही. कारण खऱ्या कलावंताला शिखर प्राप्त झाले, असे कधी वाटतच नाही. अजूनही आपल्याला काही शिकायचे आहे, काही चांगल्या भूमिका करायच्या आहेत, असेच खऱ्या कलावंताला वाटत असते. आज तुम्ही माझा यशस्वी कलावंत म्हणून गौरव केलात; पण मी अजून माझ्या यशाबाबत तृप्त नाही.

 

यशस्वी कलावंताचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of Successful Artist Essay in Marathi

बालपणी कळायला लागल्यापासून मला दुसऱ्याची नक्कल करायला खूप आवडायचे. मी पाच वर्षांचा असतानाच माझ्या आजीला एकदा तिचीच नक्कल करून दाखवली आणि तिला चकित केले. माझे आई-वडील उत्तम रसिक होते. त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच शाळा-कॉलेजात असताना अभ्यासाबरोबर माझ्या अभिनयकलेचाही विकास झाला. शाळा-कॉलेजात असताना प्रत्येक सुट्टीत मी नाट्यप्रशिक्षण शिबिरांत सामील होत असे. मी अभिनयाची काही पारितोषिकेही मिळवली. अभिनयाची जाण समृद्ध करण्यासाठी सतत नाटके पाहिली. अनेक यशस्वी कलावंतांचा अभिनय डोळ्यांत आणि मनात साठवला. त्यातून माझ्यातील अभिनेता विकसित होत गेला.

पदवी मिळवल्यावर मी दिल्लीच्या ‘अभिनय-नाट्य प्रशिक्षण महाविदयालयात प्रवेश घेतला. तेथे अभिनयाच्या प्रशिक्षणाबरोबरच नाट्यविषयक अनेक बाबींचे शिक्षण घेतले. त्यामुळे अनेक प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांतून मी अभिनय केला. गेली चाळीस वर्षे रंगभूमीवर मी वावरत आहे आणि त्याचबरोबर यशस्वी कौटुंबिक जीवन जगत आहे. माझ्या या यशात माझ्या कुटुंबातील सर्वांच्या प्रोत्साहनाचा फार मोठा वाटा आहे. ‘व्यसनाधीनता’ हा कलाक्षेत्राला मिळालेला एक शाप आहे. त्यापासून मी कटाक्षाने दूर राहिलो. लहानपणी आई-वडिलांनी माझ्या मनावर बिंबवलेला हा संस्कार होता.

“लोकहो, या अभिनयक्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीविषयी मी समाधानी आहे. ही मंडळी खूप चांगली नाट्यचळवळ करत आहेत. आता जीवनाच्या उर्वरित वाटचालीत मी नाट्यकलेचा इतिहास लिहिणार आहे व नवोदितांना अभिनयाबाबत मार्गदर्शन करणार आहे. तुमच्या सदिच्छा या कामात मला सदैव प्रोत्साहित करतीलच. त्यासाठी नटेश्वराचा मला आशीर्वाद लाभावा, हीच माझी मनोकामना आहे.”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!