शाळेचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of School Essay in Marathi

Autobiography of School Essay in Marathi: मी एक प्रशाला आहे. कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्हयातील या आडवळणी ‘बाणेर’ गावातील. पण आज माझ्या एका विदयार्थ्यामुळे गावाला जत्रेचे स्वरूप आले आहे. आज अनेक मोठी माणसे या गावात आली आहेत. मला सजवण्यात आले आहे. माझ्यावर रोषणाई करण्यात आली आहे. एवढा थाटमाट कशासाठी? अहो, माझ्या ‘विश्वास’ नावाच्या एका सुपुत्राने मला सर्व महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. यंदाच्या शालान्त परीक्षेत सर्व विभागांतून माझा ‘विश्वास तायडे’ प्रथम आला आहे.

 

शाळेचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of School Essay in Marathi

काल दुपारी ही बातमी गावात पसरली तेव्हापासूनच गावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज सकाळी अधिकृत रीतीने परीक्षेचा निकाल घेऊन महाराष्ट्र शालान्त परीक्षा मंडळाचे अधिकारी गावात आले. तेव्हा विश्वास आपल्या वडिलांच्या दुकानात काम करत होता. गुणी मुलगा. आपला विश्वास हुशार आहे, याची त्याच्या आईवडिलांना, त्याच्या गुरुजींना कल्पना होती; तरीपण विश्वास एवढे प्रचंड यश मिळवेल अशी कुणाला कल्पनाही नव्हती ! अशा या विश्वासमुळे मी आज दूरदर्शनवर झळकले.

लोकहो, तुम्ही आज माझी छोटी कुडी दूरचित्रवाणीवर पाहिलीत ना ! छोटी मूर्ती, मोठी कीर्ती ! असेच गुणी विदयार्थी मला नेहमी भेटत गेले. याचे सारे श्रेय जाते माझ्या जन्मदात्याकडे, शामराव रेगे यांच्याकडे. गाव त्यांना ‘भाऊ’ म्हणून ओळखते. शहरात प्रकृती ठीक राहत नव्हती. म्हणून ते गावाकडे आले. पण त्यांना स्वस्थ कसले बसवते! गावात शाळा नाही हे पाहून ते अस्वस्थ झाले. गावातील मुले तीनचार किलोमीटर चालत दुसऱ्या गावी जात. भाऊ त्यांना अभ्यासात मदत करत. त्याचबरोबर त्यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू केला आणि पुढच्या जूनमध्ये माझा जन्म झाला.

सुरुवातीला भाऊंच्या घरातील दोन खोल्यांचा माझ्यासाठी उपयोग केला जात असे. भाऊंना गावातील आप्पांची मदत मिळाली. भाऊंच्या पत्नी ताईपण शिकवण्याच्या कामी मदत करत. अगदी पहिलीपासून चवथीपर्यंतचा अभ्यास येथे चाले. भाऊंच्या तालमीत मुले तयार होत होती. दोनचार वर्षांत भाऊंनी सरकार दरबारी प्रयत्न करून प्रशालेची अनुमती मिळवली. मग जागेची आवश्यकता निर्माण झाली. भाऊंनी आपले पैसे घातले. गावकऱ्यांनी मदत केली, ग्रामपंचायतीनेही आपली जबाबदारी उचलली आणि आजची ही टुमदार इमारत उभी राहिली. पाहता पाहता मला प्रशालेचे स्वरूप आले. नवीन शिक्षक नेमले; पण शिक्षक नेमताना एक पक्के धोरण आखण्यात आले होते. ते म्हणजे – शिक्षक नेमायचे ते या किंवा आसपासच्या गावातलेच नेमायचे. भाऊंनी आपल्याकडची निष्ठा त्या शिक्षकांमध्ये ओतली. सर्वांनी अपार कष्ट घेतले. त्यामुळे विदयार्थ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आणि आजचे यश पाहायला मिळाले.

“माझे नामकरण करायची वेळ आली तेव्हा सर्वांना वाटत होते भाऊंचे नाव दयावे; पण भाऊंनी विरोध केला. मग सर्वानुमते ‘विदया निकेतन’ हे नाव मला मिळाले. आता लवकरच माझा रौप्यमहोत्सव साजरा होणार आहे. माझ्याकडे शिकलेले अनेक विदयार्थी शहरात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. ते माझ्यासाठी मोठी इमारत बांधणार आहेत, असे कानावा आले आहे. बघू या ! भाऊ आता थकले आहेत. आजचे यश पाहून ते तृप्त झाले आहेत. आज मला गावाचे वैभव मानले जाते.”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!