शाळेची घंटा बोलू लागते मराठी निबंध Autobiography of School Bell Essay in Marathi

Autobiography of School Bell Essay in Marathi: मे महिन्याचे दिवस होते. विदयार्थ्यांना मोठी सुट्टी होती. शाळा रिकामी, ओस पडली होती. फक्त शाळेच्या कचेरीतील मंडळी आपल्या कामात मग्न होती आणि अचानक घंटा घणघणू लागल्याचा भास होऊ लागला. कचेरीतील माणसे बाहेर आली. शाळेचे सर्व शिपाईपण घंटेजवळ जमले. त्यांत नेहमी घंटा वाजवणारा शिपाई दामूही होता. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आता कोणीही घंटा वाजवत नव्हते; पण घंटा वाजत होती आणि पुढचे नवल म्हणजे वाजणारी घंटा अचानक बोलू लागली.

शाळेची घंटा बोलू लागते मराठी निबंध Autobiography of School Bell Essay in Marathi

शाळेची घंटा बोलू लागते मराठी निबंध Autobiography of School Bell Essay in Marathi

लोकहो, मला अगदी कंटाळा आला आहे या एकाकीपणाचा. किती दिवस झाले, माझी मुले मला भेटली नाहीत. कधी संपणार ही सुट्टी ! शाळा चालू असली की माझा हा परिसर किती गजबजलेला असतो. तुम्ही ज्याला गोंगाट-गोंधळ म्हणून नावे ठेवता, तो मुलांचा गजबजाट मला खूप आवडतो. त्या आवाजाने माझे शरीर रोमांचित होते. तो गोंधळ मला शक्तिवर्धक ठरतो.

नक्की वाचा – माझा भाऊ मराठी निबंध

शाळेच्या मध्यभागी, मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर मला स्थान मिळाले आहे. मला आठवतेय, ही शाळा सुरू झाली, तेव्हा मुलांनी प्रवेश घेण्यापूर्वीच माझी स्थापना करण्यात आली. त्यामुळे शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मी साक्षीदार आहे. माझी निवड शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र कार्यासाठी, एका शाळेसाठी झाली, हाही मी माझा गौरव समजते.

आता मी तुम्हांला माझी जीवनकहाणीच सांगते. मला घडवण्यासाठी खाणीतून धातू काढण्यात आला. मग तो शुद्ध करून एका कारखान्यात आटवला गेला. तेथे इतर काही धातूंचे त्यांत मिश्रण करण्यात आले. हेतू हा की माझे काठिण्य वाढावे. मी काटक व्हावे. मग एका विशिष्ट साच्यातून मी घडले. माझ्याबरोबर माझ्या इतर काही लहान-मोठ्या बहिणी होत्या. नंतर हा लंबकाचा दांडा माझ्या कंठात अडकवला गेला; मला चकचकीत पॉलिश करण्यात आले. त्यानंतर आमचा वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास सुरू झाला.

माझ्या काही बहिणी देवळात गेल्या. काही आग विझवणाऱ्या बंबांवर स्थानापन्न झाल्या; तर काही रुग्णवाहिकांत जाऊन बसल्या. काही छोट्या छोट्या बहिणी ‘आईसफ्रूट’च्या गाडीवर चढल्या; तर कुणाची कचरा गोळा करण्याच्या गाडीवर नेमणूक झाली. तेथून कारखान्यातून मी सरळ या सरस्वतीमंदिरात आले, हे माझे फार मोठे भाग्यच.

शालेय विदयार्थ्यांच्या जीवनात मला फार महत्त्व असते. मी त्यांना वेळेची शिस्त लावते. त्यांची आवडती ‘मधली सुट्टी’ झाली हे त्यांना कळवते आणि शाळा सुटण्याच्या वेळी तर गजर करून माझ्या कोकरांना कळवते-‘चला, शाळा सुटली आता घराकडे पळा.’ असे विदयार्थ्यांच्या जीवनात मला मोठे स्थान आहे.

या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी होते. शाळेत गणपती बसतो. तेव्हा आरतीच्या वेळी दामू मलाही वाजवतो. शाळेतील एखादया संघाने यश मिळवले की तो आनंदही  मी जाहीर करते. पण एखादया दुःखद प्रसंगी मी मौन धारण करते.

“अशी मी शाळेशी एकजीव झाले आहे. मुलांच्या विरहाने व्याकूळ होऊनच मी गजर केला. चुकलेच माझे. माफ करा. असो…” बोलणारी घंटा गप्प झाली.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!