शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Martyred Soldier’s Wife Essay in Marathi

शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Martyred Soldier’s Wife Essay in Marathi: “युद्धस्य कथा रम्या”, असे म्हणतात, ते खरेच ! पण कोणाला? ज्याचे जवळचे असे कोणी धगधगत्या युद्धकुंडात गेले नसतील त्यालाच ! माझ्यासारख्या दुर्दैवी जिवांना त्या कथांची आठवणही असह्य होते. माझ्या दु:खावरची खपली अगदी ताजी आहे. कारगील युद्धात माझ्या पतीला वीरगती प्राप्त झाली.

शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Martyred Soldier's Wife Essay in Marathi

शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Martyred Soldier’s Wife Essay in Marathi

उत्तर सीमेवर कारगील क्षेत्रात शत्रूने छुपे युद्ध सुरू केले. घनघोर लढाई झाली. त्या युद्धात भारतीय सैन्याची सरशी झाली. सगळीकडे विजयोत्सव चालू असताना माझ्या व माझ्या छोट्या बाळाच्या जीवनात मात्र दाट अंधार पसरला. कारण त्या लढाईत माझ्या बाळाच्या बाबांना वीरमरण लाभले होते. मी अभागिनी निराधार झाले.

माझे आईवडील लहानपणीच वारल्यामुळे अनाथ झालेली मी माझ्या मामा-मामींकडे वाढले. मामा-मामींनी आपल्या ऐपतीप्रमाणे माझे संगोपन केले. माझे लाड कधी झाले नाहीत; पण दुःस्वासही माझ्या वाट्याला कधी आला नाही. एस्. एस्. सी. झाल्यावर मी नोकरीला लागले. स्वत:च्या पायांवर उभी राहत होते, तोच लग्न जमले. घाईगर्दीत लग्न पार पडले; कारण माझे पती लष्करात होते. लष्कराचे बोलावणे आले की, त्यांना तत्काळ रणभूमीवर जावे लागणार होते.

एक वर्षाचा सुखी संसार झाला आणि अचानक हे युद्ध सुरू झाले. माझ्या पतीला युद्धावर जाण्याचा हुकूम आला आणि त्यांनी माझा निरोप घेतला. दुर्दैवाने ती भेट शेवटचीच ठरली. त्यामुळे माझ्या पतीची आणि बाळाची एकमेकांशी नजरभेटही होऊ शकली नाही.

या छोट्याशा सांसारिक जीवनात मी पुन्हा एकदा निराधार झाले; पण मला माझ्या बाळाला निराधार करायचे नाही. एक विलक्षण आत्मिक बळ माझ्यात निर्माण झाले. मी माझे अश्रू पुसले; कारण मी वीरपत्नी होते. माझ्या पतीला वीरगती मिळाली होती. आता मला वीरमाता व्हायचे आहे.

शासनाने मला नोकरी व राहण्यासाठी जागा दिली आहे. बाळाला पाळणाघरात ठेवून मी आता कामावर जाऊ लागले. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते मी माझ्या पतीचे मरणोत्तर वीरपदक स्वीकारले. आज एकाकी जीवनात साऱ्या शौर्यगाथाच मला सोबत करतात. माझा निर्धार मात्र अधिक बळकट झाला आहे; म्हणूनच मी माझ्या बाळालाही शूर सैनिक बनवणार आहे.

Share on:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment