मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध Autobiography of Indian National Flag Essay in Marathi

Autobiography of Indian National Flag Essay in Marathi: मित्रांनो, तो दिवस मला अजूनही आठवतो. भारतीय क्रिकेट संघाने ‘ट्वेंटी. ट्वेंटी ‘च्या सामन्यांतील विश्वचषक जिंकला आणि संपूर्ण देशात देशप्रेमाच्या लाटाच्या लाटा उसळल्या. मीसुद्धा बेभान होऊन लहरलो, फडकलो ! माझ्या देहाच्या प्रत्येक धाग्यातून, प्रत्येक तंतूतून देशप्रेमाचे वारे सळसळत होते ! त्या दिवशी मैदानावर सर्वत्र माझीच रूपे फडकत होती. भारतीय खेळाडूंनी मला उंच उंच फडकवत मैदानात फेऱ्या मारल्या, तेव्हा मला धन्य धन्य वाटले ! हा मोलाचा क्षण मी कधी कधी विसरणारच नाही ! मित्रांनो, ही प्रतिष्ठा, हा सन्मान माझ्या जन्मापासून मला मिळत आला आहे. माझी कहाणी तुम्हाला ठाऊक आहे का? ऐकाच तर मग माझी कहाणी…

मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध | Autobiography of Indian National Flag Essay in Marathi

मी राष्ट्रध्वज बोलतोय मराठी निबंध Autobiography of Indian National Flag Essay in Marathi

मित्रांनो, मी आज तुम्हांला दिसतो ना, तसा जन्माच्या वेळी नव्हतो. जन्मापासून माझ्यात खूप बदल होत गेले आहेत. मला अनेक रूपे मिळत गेली. माझा जन्म झाला २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीमध्ये. या दिवशी मादाम कामा या राष्ट्रभक्त महिलेने समाजवादयांच्या जागतिक परिषदेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज म्हणून तिरंगी निशाणाची निर्मिती केली. ते माझे पहिले रूप ! या निशाणात हिरवा, केशरी व तांबडा या रंगांचे तीन आडवे पट्टे होते. हिरव्या पट्ट्यात कमळाची आठ चित्रे, केशरी पट्ट्यात ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे आणि तांबड्या पट्ट्यात सूर्यचंद्राची चित्रे – असा माझा एकंदरीत साज होता. पण मित्रांनो, या रूपामध्ये मी भारतात मात्र वावरू शकलो नाही.

नक्की वाचा – माझे बाबा मराठी निबंध

काही वर्षांनंतर म्हणजे १९१६ साली अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी अटकेत असताना मला दुसरे रूप दिले. पाच तांबडे पट्टे व चार हिरवे पट्टे असलेला वरच्या डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक, त्याखाली सात तारे व उजवीकडे चांद अशी चिन्हे धारण करणारा राष्ट्रध्वज, असे माझे रूप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. पण हेही रूप फार काळ टिकले नाही.

काही काळाने महात्मा गांधींनी माझ्या रंग-रूपाबाबत विचारमंथन सुरू केले. देशभर गंभीरपणे विचार सुरू झाला. अनेकांच्या अनेक सूचना आल्या. त्यानुसार तांबडा, हिरवा व पांढरा या रंगांचे आडवे पट्टे व त्यांवर गर्द निळ्या रंगातील चरख्याचे चित्र, असे माझे नवे रूप तयार झाले. १९२१ पासून हाच तिरंगा राष्ट्रीय निशाण म्हणून पुढे आला. मित्रांनो, नंतरही यात बदल होत गेले. आज तुम्हांला दिसते ना, ते माझे रूप २२ जुलै १९४७ रोजी निश्चित केले गेले. भारताच्या संविधान समितीने या दिवशी माझ्या या रूपाला मान्यता दिली. त्यानुसार गर्द केशरी, पांढरा व गर्द हिरवा या क्रमाने आडवे तीन पट्टे व मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगातील अशोकचक्र हे माझे रूप भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून सिद्ध झाले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी माझ्या या रूपामागचा राष्ट्रनेत्यांचा विचार छान समजावून सांगितला आहे. माझ्या अंगावरील तीनही रंग वेगवेगळ्या गोष्टींचे सूचक आहेत. केशरी रंग देशभक्ती आणि त्याग यांचे प्रतीक आहे; तर माझा हिमधवल रंग चारित्र्य, शांतता आणि मांगल्य यांचा सूचक आहे आणि हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हे राष्ट्र धर्म, नीती आणि प्रगती यांच्याच मार्गावर अखंड गतिमान राहील.

आज मला माझे जीवन कृतार्थ वाटते, कारण एका स्वतंत्र लोकशाहीवादी देशाचा मी प्रतिनिधी आहे. आज जगात मला मोठा सन्मान मिळतो. राजकीय परिषदांबरोबरच क्रीडांगणावरही मी गौरवाने फडकत असतो. मला हे वैभव प्राप्त करून देण्यामागे हजारो देशवासीयांचे कर्तृत्व आहे, हे मी विसरू शकत नाही. पण कुठे माझा अपमान झाला तर? म्हणजे मला उलट लावले गेले, जीर्ण स्थितीत लावले गेले वा माझ्याशी गैरवर्तन केले गेले, तर तो माझाच नाही, तर माझ्या देशाचा अपमान असतो आणि तो मात्र मला सहन होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य दिनानंतर वा प्रजासत्ताक दिनानंतर कागदी स्वरूपातील मला उकिरड्यावर फेकणारे, त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे नकळतपणे माझा अपमानच करत असतात. मित्रांनो, एखादया थोर नेत्याच्या वा शूरवीराच्या शवपेटीवर मला ठेवले जाते. तेव्हा माझे मन भरून येते; पण तो त्या व्यक्तीचा, त्याच्या कार्याचा गौरव असतो. ही आहे माझी कहाणी ! सहस्र शब्दांतही न मावणारी, तरीही सफल, संपूर्ण अशी.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!