वृद्धाश्रमातील आजोबांचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Grandfather Essay in Marathi

Autobiography of Grandfather Essay in Marathi: या वर्षी आमच्या शाळेने खोपोलीच्या ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित केली. मला या सहलीत सहभागी होण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मनात आले… आपण तेथे काय पाहणार, काय करणार? पण आमच्या शिक्षकांनी वृद्धाश्रम म्हणजे काय, वृद्धाश्रमाची गरज काय – हे सारे व्यवस्थित समजावून सांगितले. मग मात्र आमचे कुतूहल जागे झाले.

 

वृद्धाश्रमातील आजोबांचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Grandfather Essay in Marathi

ठरलेल्या दिवशी आम्ही खोपोलीला पोहोचलो. ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाचा परिसर रम्य होता. तेथे बागेत वावरणारी वृद्ध माणसे प्रसन्न दिसत होती. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे सर्वांनी जेवणाचा आग्रह केला. प्रार्थनेनंतरच भोजनाला सुरुवात आली. गप्पाटप्पांत भोजन संपले आणि मंडळी पांगली. तेव्हा आम्हांला घेऊन तात्या तेथील ग्रंथालयात गेले. तात्यांचा आणि आमचा परिचय जरी आताच झाला होता; तरीपण वाटत होते की, जणू आमची फार जुनी ओळख आहे.

तात्यांनी आम्हांला विचारले, “कसा वाटला हा मातोश्री आश्रम?” आणि आम्ही काही बोलायच्या आत तेच पुढे सांगू लागले, “मी आता गेली आठ वर्षे येथे राहत आहे. अगदी आनंदात, सुखात आहे. येथे असणाऱ्या बहुतेक जणांचा हाच अनुभव आहे. मी निवृत्त आहे. मला पेन्शन मिळते. आर्थिकदृष्ट्या मी स्वावलंबी आहे. माझी दोन्ही मुले परदेशात स्थायिक झाली आहेत. मी जाऊनही आलो आहे. मुले तेथे कायम राहण्याचा आग्रह करीत होती; पण माझे मन रमेना. म्हणून मी परत आलो. काही दिवसांनी पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे एकटा पडलो. मी तडक या ठिकाणी आलो. प्रकृती उत्तम असल्यामुळे आश्रमाची काही कामेही करतो.

येथे आलेल्यांपैकी प्रत्येकाची काही ना काही कथा आहे. कुणी आपण होऊन आले आहेत; तर कुणाला आणून सोडले आहे. पण भूतकाळ आम्ही विसरलो आहोत. भविष्यकाळाचा आम्ही विचार करत नाही. आम्ही फक्त वर्तमानात जगतो. आला दिवस आनंदात घालवतो. सणवार, राष्ट्रीय दिन साजरे करतो. दूरचित्रवाणी, चित्रपट पाहतो. जमतील ते खेळ खेळतो. पुस्तके वाचतो, चर्चा करतो तसेच व्याख्यानेही आयोजित करतो. मुख्य म्हणजे एकमेकांना मदत करतो. एखादयाची काही आर्थिक अडचण असली तरी सर्वजण मदतीचा हात पुढे करतात.

तुम्हां मुलांना वाटत असेल की, हे वृद्ध म्हणजे थकलेले, खंगलेले जीव ! येथे असणार रडकथा, कण्हणे, उसासेच. पण तसे नाही. आम्ही प्रत्येक नवीन दिवस जीवनातील बक्षीस मानतो आणि आनंदात घालवतो.

आता एखादे दिवशी आमच्यातील एखादी व्यक्ती जगाचा निरोप घेते; मग आम्ही त्या व्यक्तीला चिरशांती मिळावी म्हणून प्रार्थना करतो. वृद्धाश्रमचालक तिच्या नातेवाइकांना कळवतात. नातेवाईक नसले वा दूर असले, तर स्वतः त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करतात. आम्ही सर्वजण त्या दिवशी मौन पाळतो व उपोषण करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू होतात. कारण सर्वांना हे माहीत आहे की, प्रत्येकालाच या वाटेवरून केव्हा ना केव्हा जायचे आहे.

“येथे सर्व कामांसाठी नोकर आहेत; पण तरीही येथील वृद्ध आपल्याला आवडते ते काम करतात. कुणी बागकाम करतात, कुणी स्वयंपाकघरात काम करतात, तर कुणी वृद्धाश्रमाच्या कचेरीत काम करतात. आमचे आपापसात भांडणतंटे होत नाहीत; कारण आम्ही खरोखरच रागलोभाच्या पलीकडे गेलो आहोत. असा हा आमचा शांतीचा, सुखाचा वानप्रस्थाश्रम आहे.”

तात्यांचे बोलणे ऐकून आम्ही भारावून गेलो, पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन त्यांचा निरोप घेतला.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!